
मुंंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. आता राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसवर काय निर्णय येणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे.
ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे सरकार पडेल, असे दावे केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासाठी आता फक्त चार ते पाच तारखा उरल्या आहेत. यामध्ये ८ ते १२ मे या कालावधीत सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरतील, असे जाणकार म्हणत आहेत. त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. तर दुसरीकडे जवळपास २६ जून २०२२ पासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भातच्या प्रकरणावर सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरु होती.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात तरी हा निकाल लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. १३ आणि १४ मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे ८ ते १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.