मुंबई- महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अशा दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जातं आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
“जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही घेतला. यावेळी राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतली आव्हानं आणि उपाय योजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरीचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. ” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावलं उचलावीत अशीही मागणी चाकणकर यांनी केली आहे.