बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या गायत्री रोहणकर हीने राजधानी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत उत्कृष्ट व दिलखेचक रॅम्प वॉक सादर करुन अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत त्यांना भुरळ घातली. सोबतच फॅशन आयकॉन्स पुरस्कार पटकावित देशात शेगावच नाही तर बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकीक वाढवला आहे.
तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून गायत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेगाव येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या गायत्री रोहणकरने प्राथमिक शिक्षण अकोला येथे घेतले. तर पद्वीचे शिक्षण खामगाव येथे पूर्ण केले. फॅशनचा कोणताही गंध व मार्गदर्शन नसतांना गायत्रीने अल्पावधीतच स्वत:च्या हिंमत व बळावर या क्षेत्रात आपल्या नावाचीच नव्हे तर जिल्ह्याची छाप उमटवली.
सोबतच तिला नुकताच वसुंधरा गाझियाबादच्या रॉयल पॅलेसमध्ये स्टायलिश फॅशन आयकॉन्स पुरस्कार-२०२३ ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे संतनगरी शेगावसह बुलडाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक असून गायत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संबंधीत क्षेत्राचा गंधही नसतांना, प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर गायत्रीने हे यश संपादन केले आहे.