
अमरावती | खोलापुरी गेट परिसरात मायलेकीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. आपल्यानंतर मुलीचे काय होईल, या विचाराने एका ३५ वर्षीय महिलेने आपल्याला मुलीसोबत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री भले (३६) आणि त्यांची मुलगी स्वरा भले (१०) यांनी शुक्रवारी (२० जानेवारी) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच दोघींचा मृत्यू झाला होता.
भाग्यश्री आपल्या मुलीसह माहेरी राहत होत्या. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. सायंकाळी घरी परतता त्यांनी पाहिले की दार आतून बंद आहे. शेजाऱ्यांच्या मदतीने आत जाताच त्यांना मायलेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. घटनास्थळी भाग्यश्री यांनी लिहिलेली चिट्ठी देखील मिळाली आहे.
मिळालेल्या चिट्ठीनुसार, आपल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येचा दोष कोणाला देऊ नये, चौकशी करू नये, लेकीच्या काळजीपोटी तिलाही सोबत घेऊन जात आहे, असे घटनास्थळी मिळालेल्या चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.