
बीड | मयत शेतकऱ्याच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेत उघडकीस आला आहे.
मयत शेतकऱ्याला जिवंत दाखवून, प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळालेली जमा रक्कम बँकेच्या अधिकाऱ्यांकडून काढण्यात आली आहे. कानडीघाट येथील मयत शेतकरी धोंडीबा कुडके यांच्या खात्यातील रक्कम काढण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शेतकरी बलभीम झोडगे यांच्या खात्यातील १ लाख इतकी रक्कम गायब झाली होती. याच प्रकरणाची चौकशी चालू असतानाच, दुसरे शेतकरी धोंडीबा कुडके यांच्याही खात्यातील जमा रक्कम गायब झाली.
इतकेच नव्हे, तर मयत शेतकऱ्यांसह इतर १२ शेतकऱ्यांच्या खात्यातूनही परस्पर पैसे काढण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत, बीडमधील शाखा अधिकाऱ्यांसह रोखपाल आणि तपासणीला निलंबित केले आहे. तसेच, आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.