मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचं नाट्य महाराष्ट्रात रंगलं होतं. २ मेच्या दिवशी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. त्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. तसंच कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. त्यानंतर ५ तारखेला शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. हा राजीनामा त्यांनी मागे का घेतला? याचं कारण आता त्यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“मी राजीनामा दिला तेव्हा मला हा विश्वास होता की मी माझ्या सहकाऱ्यांची समजूत काढू शकेन. मात्र मी ते करु शकलो नाही. मी राजीनामा दिला कारण मी स्वतःच त्याविषयी गंभीर होतो. राजीनामा दिल्यानंतर पुढच्याच दिवशी काय करायचं आहे हे माझ्या डोक्यात तयार होतं. कारण पुढच्याच दिवशी मी पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करणार होतो.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.