
खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात ट्रक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट दरीत कोसळला. पण मोठ्या झाडामध्ये अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. पण ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ट्रकला अपघात झाला. अचानक रिव्हर्स गिअर पडल्यामुळे एक ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात दरीत कोसळला. महत्वाचे म्हणजे दरीत कोसळल्यानंतर ट्रक एका महाकाय वृक्षाला धडकून अडकला. त्यामुळे तो दरीत कोसळता कोसळता वाचला. या अपघातामध्ये ट्रक चालकाला किरकोळ दुःखापत झाली आहे.
मुंबईहून चिपळूणच्या दिशेने हा ट्रक जात होता. त्याचवेळी भोस्ते घाटातील चढावर अचानक ट्रकचा रिव्हर्स गिअर पडल्यामुळे ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. अपघातामध्ये ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ट्रक चालकाला रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या ट्रक चालकाची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.