
मुंबई- उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण आणि मध्य रेल्वेने संयुक्तपणे कोकण रेल्वे मार्गावर २६ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मांडवी, तुतारी या प्रमुख रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०११२९/०११३० लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण आज, गुरुवारपासून खुले होणार आहे.
कधी सुटणार?
गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी ते थिविम विशेष रेल्वे ६ मे ते ३ जून दरम्यान दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. एलटीटीहून रात्री १०.१५ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० थिविम ते एलटीटी विशेष रेल्वे ७ मे ते ४ जून दरम्यान दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी धावणार आहेत. थिविमहून दुपारी ४.४० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.
कुठे थांबणार?
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
असे करा आरक्षण?
विशेष गाडी ०११२९/०११३० साठी विशेष शुल्कासह आरक्षण आजपासून खुले करण्यात आले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि संकेतस्थळावर आरक्षण करता येईल.