⏩ ३ मे /मुंबई: राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा मनोज सौनिक यांच्याकडे सोपविल्यानंतर राज्य सरकारने लगेचच प्रशासनातही फेरबदल करण्यास सुरुवात केली. त्यानुसार मंगळवारी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची मंत्रालयात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर अतिरिक्त मुख्य साचिव मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाचे संचालक पी. शिवशंकर यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
महापारेषणचे अध्यक्ष, तसेच मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांची मंत्रालयात गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली. राधिका रस्तोगी यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवपदी, मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी, तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची औरंगाबादमध्ये राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली झाली आहे.