
▶️ मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत. तसेच शरद पवार यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे म्हणत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून या निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईमध्ये सुरू होता. याच कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ज्यानंतर कार्यकर्ते आणि नेते प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांच्या या मोठ्या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. पवार साहेब निर्णय मागे घ्या, देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो..! अशा घोषणा देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच शरद पवार यांच्या या निर्णयानंतर बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नाझेर काजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बुलढाण्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावर बोलताना कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे. वयोमानामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला यावर विश्वास बसत नाही. ते कधीच निवृत्त होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी या निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी केली .