
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे कारण भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते, असे शरद पवार यांनी नुकतेच सांगितले होते.
मुंबई , 2 मे 2023-
सुप्रिया सुळेंच्या २ राजकीय गौप्यस्फोटाच्या घोषणेची चर्चा
एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडे अजित पवार यांची भाजपशी जवळीक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सर्व परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रातून घोषणा केली की, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी भाकरी फिरवणारे विधान केले तेव्हा राष्ट्रवादीत काहीतरी मोठे घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्याचवेळी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे Supriya Sule यांनीही १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होतील, असे सांगितले होते. एक महाराष्ट्रात आणि दुसरा दिल्लीत. अशा स्थितीत शरद पवारांनी पहिला गौप्यस्फोट केला की काय, असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे, आता दुसरा राजकीय धमाका काय होऊ शकतो यावर चर्चा सुरु झाली आहे.
भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे कारण भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते, असे शरद पवार यांनी नुकतेच सांगितले होते. म्हणजेच नेतृत्व बदलाची हीच योग्य वेळ असल्याचे संकेत पवारांनी दिले होते. यानंतर काही दिवसांनी शरद पवारांनी वाय.बी. चव्हाण केंद्रातून भाकरी फिरवली की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली असे बोलले जात आहे. म्हणजेच पहिला राजकीय स्फोट महाराष्ट्रातून झाला आहे. आता प्रश्न पडतो की दुसरा राजकीय स्फोट काय असू शकतो? दुसरा राजकीय धडाका दिल्लीतून येईल, असे सुळे Supriya Sule म्हणाल्या होत्या. हा दुसरा स्फोट शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्याविषयी असणार आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.