पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल हा ९५. ८१ टक्के लागला असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९९. १ टक्के लागला आहे. त्यानंतर पुणे विभागाचा निकालात दूसरा क्रमांक लागला आहे. पुणे विभागाचा निकाल हा ९६ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाचे गोसावी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निकाल घोषित केला आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे. यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या वर्षी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.