⏩महाराष्ट्रात उभारणार 900 कोटींचा प्रकल्प
रायगड जिल्ह्यात ल्युब्रिकंट्सचे उत्पादन करण्यात आघाडीची असलेली ExxonMobil ही कंपनी प्लांट उभारणार आहे. या प्लांट उभारणीसाठी सुमारे 900 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करणार आहे. दरवर्षी तब्बल 1,59,000 किलो लिटर ल्युब्रिकंट्सचे उत्पादन या कंपनीत केले जाणार आहे. 2025 या वर्षाच्या शेवटी हा प्लांट पूर्णतः तयार होण्याचा अंदाज आहे. प्लांटच्या बांधकामावेळी 1,200 मजुरांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
⏩राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा
मागील महिन्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवार आणि शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
⏩दिल्लीत 2024 पर्यंत मोफत वीज
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना वीजबिलापासून दिलासा दिला आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी वीज फ्री करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीकरांना 2024 पर्यंत 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे. तसेच 50 टक्के सवलतीसह 400 युनिटपर्यंत वीज मिळणार आहे. याशिवाय वकील, शेतकरी आणि 1984 च्या दंगलग्रस्तांनाही पूर्वीप्रमाणेच वीजेवर अनुदान मिळत राहणार आहे असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
⏩आज रंगणार राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स तसेच पंजाब किंग्स या संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पंजाब किंग्स पाचव्या क्रमांकावर आहे. संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होणार आहे.