
महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये, रत्नागिरी जेट्ससाठी 31 वर्षीय फलंदाजानं शानदार कामगिरी केली आणि सामन्यात शानदार अर्धशतकासह 58 धावा केल्या. MPL 2025 मध्ये रत्नागिरीच्या फलंदाजाचं वादळ …
पुणे : IPL संपताच सुरु झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा पाचवा सामना रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये रत्नागिरी संघाला 7 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. रत्नागिरी संघानं प्रथम फलंदाजी करत 173 धावा केल्या. यानंतर कोल्हापूर टस्कर्सनं लक्ष्य सहज गाठले. संघ हरला असला तरी, दिव्यांग हिंगणेकरनं त्यांच्याकडून जोरदार फलंदाजी केली आणि शानदार अर्धशतक झळकावलं.
दिव्यांगच्या 26 चेंडूत 58 धावा :*सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या रत्नागिरी जेट्सची सुरुवात खराब झाली. धीरज फटांगरे आणि अभिषेक पवार यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. प्रीतम पाटीलही एक धाव काढल्यानंतर बाद झाला. यानंतर, कर्णधार अझीम काझी आणि दिव्यांग हिंगणेकर यांनी शानदार फलंदाजी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. दिव्यांगने 26 चेंडूत 58 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्यानं सामन्यात 223.08 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. त्याच्याशिवाय अझीमनं 47 धावा केल्या. निखिल नाईकनं 28 चेंडूत 40 धावा केल्या. या खेळाडूंमुळंच रत्नागिरी जेट्स संघ 173 धावा करु शकला.
आर्थव डकवेच्या षटकात पाच षटकार : या सामन्यात, दिव्यांग हिंगणेकरनं अर्थव डकवेनं टाकलेल्या डावाच्या 11व्या षटकात सलग 5 चेंडूत 5 षटकार मारले. त्यानं पहिल्या पाच चेंडूत हा कारनामा केला, तर त्यानं सहाव्या चेंडूवर एक धाव घेतली आणि एका षटकात 6 षटकार मारण्यात तो चुकला. या षटकात, आर्थवनं एक वाईड बॉलही टाकला आणि अशा प्रकारे षटकात एकूण 32 धावा झाल्या.
कोल्हापूर टस्कर्स संघ विजयी : या सामन्यात कोल्हापूर टस्कर्सकडून अंकित बावणेनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 51 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय कर्णधार राहुल त्रिपाठीनं 18 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि एक षटकार होता. त्याच्याशिवाय सचिन दास आणि सिद्धार्थ म्हात्रे यांनी 35-35 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी तीन षटकारही मारले. फलंदाजांच्या कामगिरीमुळं कोल्हापूर संघानं केवळ 18.4 षटकांत लक्ष्य गाठलं. रत्नागिरी जेट्सचे गोलंदाज सामन्यात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. दिव्यांग हिंगणेकरनं गोलंदाजीत दोन विकेट्सही घेतल्या.