
रत्नागिरी: कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने हे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात सामंजस्य करार ही झाला होता. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याने विकासाचा मार्ग खुला करून दिला आहे.
गेली 2 वर्षे कोरोनोमुळे कोकण रेल्वे तोट्यात चालत होती,त्यामुळे कोकण रेल्वेला रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी नसल्याने प्रवाशी वर्गाच्या रोषाला बळी पडावे लागत होते परंतु अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे.ही तरतूद झाल्याने कोकण रेल्वेवरील मोठा अर्थभार कमी झाला असून प्रवाशांसाठी आता इतर मूलभुत सुविधांवर कोकण रेल्वे प्रशासनाला भर देता येइल असा विश्वास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी व्यक्त केला.
यामुळे रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी,चिपळूण,संगमेश्वर, राजापूर सहीत सिंधूदुर्ग जिल्हयातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या रेल्वे हद्दीतील रस्त्यांची काम होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
या अर्थसंकल्पात रस्ते काँक्रीटीकरणासाठी 66 कोटींची तरतूद केल्याने पुढील किमान वीस वर्ष तरी हे रस्ते खराब होणार नसल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. याकरिता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिन वहाळकर यांनी प्रवासी वर्गातर्फे आभार मानले.