
कराची- पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील मशिदीजवळ आज शुक्रवारी आत्मघाती बाँम्बस्फोट झाला आहे. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा हल्ला झाला. डीएसपी नवाज गिश्कोरी यांच्या कारजवळच हा स्फोट झाला. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, सर्व जखमींना क्वेट्टा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गरज पडल्यास जखमींना कराचीलाही हलवण्यात येईल. जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल. अचकझाई पुढे म्हणाले की, आमच्या शत्रूंना विदेशी शक्तींच्या मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून शांतता बिघडवायची आहे. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. बलुचिस्तानमधील सरकारी मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

एसी मुनीम यांनी सांगितलं की, अलफलाह रोडवरील मदीना मशिदीजवळ ईद मिलादुन नबी (पीबीयूएच) जुलूससाठी लोक जमत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुष्टी केली की हा स्फोट डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ झाला. हा स्फोट ‘आत्मघाती स्फोट’ होता आणि हल्लेखोराने डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ स्वत:ला उडवलं अशी माहिती एसएचओ लेहरी यांनी दिली आहे. पीटीआयचे नेते इमरान इस्माईल यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि म्हटलं की, ‘जे निष्पाप लोकांना मारतात ते अत्याचारी आणि दहशतवादी आहेत.’ कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणा लवकरच गुन्हेगारांना पकडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.