रायगडावरील शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार; शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा….

Spread the love

रायगड- स्वराज्याची स्थापना करण्याचं ध्येय घेऊन वयाच्या १६व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले. रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. तेव्हा त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

किल्ले रायगडावर १ ते ६ जून या कालावधीत ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारनं आज तिथीप्रमाणं शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठ्या घोषणा केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची आज घोषणा करण्यात आली. तसंच, प्रतापगडच्या संवधर्नाकरता प्रतापगड प्राधिकारण करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले असतील, अशीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लंडनच्या संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी पुढे स्पष्ट केले. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मी शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून कारभार करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सरकारनं जसं शिवाजी महाराज कष्टकरी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहायचं. आपल्या सरकारनं शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची योजना केलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणं आपल्या राज्यसरकारनं देखील नमो शेतकरी सन्मान योजना ६ हजार रुपयांची आपण जोडली आहे. ही तरतूद देवेंद्र फडणवीस यांनी केलं, हे शेतकऱ्यांसाठी आहे. सिंचन वाढीसाठी आपल्या सरकारनं अनेक निर्णय घेतले. जलयुक्त शिवार योजना आम्ही पुन्हा सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य गोर गरीब रयतेचं राज्य होतं. त्यांनी जातीभेद केला नाही, शिवाजी महाराजांनी महिलांना पुढं येण्याची संधी दिली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page