समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, CM शिंदेंची घोषणा; मृतांचा आकडा 17 वर…

Spread the love

मुंबई- समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे येथे सोमवारी मध्यरात्री पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. त्यात तब्बल 17 मजुरांचा मृत्यू झाला असून, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेला दुर्दैवी अपघात हा अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले आहेत. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश दिले आहेत.

आज पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेची माहिती घेतली. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एनडीआरएफ चे पथक याठिकाणी पोहचले असून बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यास सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

मदत कार्य सुरू – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका ट्विटद्वारे या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, शहापूर तालुक्यातील सरलंबे येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना घडलेल्या दुर्घटनेत मजुरांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. पुलाचं काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्यानं हा अपघात झाला. बचावकार्य युद्धपातळीवर राबवलं जात आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.

घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशीचे आदेश – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आ दुर्घटनेवर शोक व्यक्त करत या घटनेच्या तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना एक दुर्घटना होऊन काही मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

या घटनेत 3 कामगार जखमी झाले. त्यांच्यावर रूग्ण्यालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page