
परभणी , 12 मे 2023- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शौचालयाच्या सेप्टिक टँकची साफसफाई करताना श्वास गुदमरून पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील भाऊचा तांडा शिवारातील एका शेतातील आखाड्यावरच्या सेप्टिक टँकच्या साफसफाईचं काम सहा मजूर करत होते. दुपारी तीन वाजल्यापासून हे काम सुरू होतं. रात्रीच्या वेळी अचानक मजुरांना गुदमरू लागले. त्यांना जास्त अस्वस्थ वाटू लागल्यानं आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली.
सर्व अत्यवस्थ मजुरांना तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं. मृतांमध्ये शेख सादेक, शेख जुनेद, शेख शारोक, शेख नवीद, शेख फेरोज यांचा समावेश आहे. जखमी मजुरास परळीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मजूर एकाच कुटुंबातील असल्यानं या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.