आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने ५ कोटींची फसवणूक; गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

Spread the love

पुणे – 25 ऑक्टोबर : आभासी चलनात गुंतवणूक केल्यास २०० दिवसात रक्कम दुप्पट देण्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, मुख्य आरोपी पसार झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सागर दत्तात्रय गोऱ्हे (वय ३१, रा. नेहा कन्स्ट्रक्शन, धनकवडी), महेश लक्ष्मण भोसले (वय ३४, रा. विवा सरोवर, जांभुळवाडी, आंबेगाव), ऋत्विक मोहन पांगारे (वय २३, रा. गगन समृद्धी सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर लिनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीचे संचालक निलेश जेधे, जीवन मागाडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघेजण पसार झाले आहेत.

जेधे आणि मागाडे यांनी सिंहगड रस्ता परिसरातील वसंत सखा प्लाझा या इमारतीत लिनक्स ट्रेड डॉट युके कंपनीच्या नावाने कार्यालय सुरू केले. त्यांनी आभासी चलनात गुंतवणूक केल्यास २०० दिवसात दुप्पट रक्कम देण्यात येईल, असे आमिष दाखविले. अनेकांनी कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातीला परतावा दिल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. त्यानंतर अनेकांनी मोठ्या रक्कम गुंतविल्या, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली. आरोपी जेधे, मागाडे पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page