दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतात गुरुवारी एक मोठा अपघात झाला. इस्टर कॉन्फरन्ससाठी जाणारी बस पुलाच्या कठड्यावरुन पडल्यानं 45 जणांना जीव गमवावा लागला. तर यात 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झालीय.
*लिम्पोपो (दक्षिण आफ्रिका) :* इस्टर कॉन्फरन्ससाठी जाणारी बस गुरुवारी एका पुलाच्या कठड्यावरुन घसरल्यानं दक्षिण आफ्रिकेत भीषण अपघात झालाय. या अपघातात बसमधील सुमारे 45 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळं दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतात शोककळा पसरलीय.
*इस्टर कॉन्फरन्सला जाताना भीषण अपघात…*
स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेच्या लिम्पोपो प्रांतात गुरुवारी इस्टर कॉन्फरन्ससाठी जाणारी बस कठड्यावरुन पडल्यानं किमान 45 लोक ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय. या अपघातातील सर्व यात्रेकरु हे शेजारचा देश बोत्सवानाची राजधानी गॅबोरोन येथून इस्टर कॉन्फरन्सला जात होते. तेव्हा हा अपघात झाला. या दुर्घटनेत फक्त 8 वर्षांची एक मुलगी बचावली असून तिला विमानानं रुग्णालयात नेण्यात आलं. हा अपघात दक्षिण आफ्रिकेतील मोकोपने आणि मारकणे दरम्यानच्या ममतलाकला पर्वताच्या खिंडीत झाल्याचं स्थानिक मीडियानं सांगितलंय. बस पुलावरुन खाली पडल्यानंतर बसला आग लागल्याची माहिती आहे. या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.
*पुलाच्या 50 मीटर खाली कोसळली बस…*
परिवहन विभागानं एका निवेदनात म्हटलंय की, ‘वृत्तानुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस पुलाच्या 50 मीटर खाली खडकाळ पृष्ठभागावर पडली आणि तिला आग लागली. यातील ठार झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक विभागानं सांगितलं की, ‘काही मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आमचं सरकार बोत्सवानाला हे मृतदेह परत पाठवेल, असं दक्षिण आफ्रिकेचे वाहतूक मंत्री सिंदीसिवे चिकुंगा यांनी सांगितलंय.
*जबाबदारीनं वाहन चालवण्याचं आवाहन…*
दक्षिण आफ्रिकेचे परिवहन मंत्री सिंदीसिवे चिकुंगा यांनी अपघात स्थळी सांगितलं की, “या दु:खद बस अपघातामुळं प्रभावित झालेल्या कुटुंबांप्रती मी मनापासून शोक व्यक्त करतो. या कठीण काळात आमचे विचार आणि प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. सर्वांनी सदैव सतर्कतेनं जबाबदारीनं वाहन चालवा.”