त्या नराधमाला भारतात आणणार
मुंबई ,26 सप्टेंबर- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2011 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वूर राणाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 405 पानी आरोपपत्र राणाविरोधात दाखल केले. अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या राणाचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी हे पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
राणा सद्या अमेरिकेतील जेलमध्ये
कॅनडाचे नागरिकत्व असलेला राणा हा सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. मे महिन्यात तहव्वूरचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्यात तहव्वूरचा राणाचाही सहभाग असल्याचा आरोप आहे.
लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचाही कट रचण्यात समावेश होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्या निमित्ताने डेव्हिड हेडली हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला.
मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन हेडली हा शिकागोला परतला होता. त्यानंतर त्याने मुंबईतील हे फोटो लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले, अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली होती. डेव्हिड हेडली हा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.