जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०७, २०२३.
शैक्षणिक सहलींमुळे रत्नागिरी एस.टी. विभागाला कोट्यावधी रूपयांचा व्यवसाय मिळाला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महामंडळाने सहलींसाठी ८८५ गाड्या पुरवल्या होत्या. या गाड्यांमुळे एस.टी. विभागाला ४ कोटी ९ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे महामंडळाच्या तिजोरीत हे उत्पन्न पडले आहे. दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली निघतात; परंतु कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊनमुळे दोन वर्षे शैक्षणिक सहलींना परवानगी नव्हती. त्यानंतर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे एस.टी. सेवा कित्येक दिवस बंद होती. सलग दोन मोठ्या घटना घडल्याने एस.टी.चे प्रचंड नुकसान झाले. त्यात प्रवासीवर्गही तुटला. त्यामुळे रत्नागिरी विभागाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला; मात्र एप्रिलपासून पुन्हा एसटीची सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. प्रवासीवर्ग पुन्हा एस.टी.कडे वळला आहे.
तसेच यंदाही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहलींसाठी महामंडळाकडून सवलतीच्या दरात एस.टी. उपलब्ध करून देण्यात आल्या. रत्नागिरी विभागातून नोव्हेंबरमध्ये सवलतीतील १७ गाड्या तर विनासवलतीच्या ४७ गाड्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकूण १६४ गाड्यांमुळे २ कोटी ८४ लाख २१ हजार १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे तसेच डिसेंबरमध्ये सवलतीच्या ४६६ तर विनासवलतीच्या १५५ गाड्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकूण ७२१ गाड्यांमुळे एक कोटी २४ लाख १९ हजार ६३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. रत्नागिरी विभागातील ९ ही आगारांतून सवलतीच्या, विनासवलतीच्या गाड्या सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.