रत्नागिरी,(जिमाका) : नाक्यावर उभं राहण्यापेक्षा वेगळं काही काम करुन नागरिकांसाठी सुविधा निर्माण करणं हे देखील आरटीओं चे काम आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांना सुविधा मिळतील. असे राज्यात आदर्शवत काम करा, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
३५ वे रस्ता सुरक्षा अभियान आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते फीत कापून आज करण्यात आले. यानंतर दीपप्रज्ज्वलन करुन रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्कारी अभियंता अमोल ओटवणेकर, बिपीन बंदरकर, राजन शेटे, विजय खेडेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, आरटीओ विभाग जनजागृती करण्यात यशस्वी झाला आहे. अपघातांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी कपात होण्यास मदत झाली आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी पहिल्या मजल्याला साडेचार कोटी मंजूर केले आहेत. अजून अडीच कोटी विविध कामांसाठी दिले जात आहेत. या कार्यालयातून सर्वसामान्यांची सेवा व्हायला हवी.
नियमानुसार कारवाई करतानाच परिस्थिती तपासून माणुसकी म्हणूनही पहावे. अशा नागरिकांचा दुवा लागेल. आरटीओ कार्यालयाला एमपी थिएटरसाठी तसेच अन्य सुविधांसाठी निधी दिला जाईल. त्याबाबत त्यांनी नियोजन करावे. सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयातून सुविधा मिळाव्यात असे आदर्शवत काम करावे आणि राज्यात या कार्यालयाविषयी चांगला संदेश जाईल, असे काम करण्याचा सल्लाही पालकमंत्र्यांनी दिला.
यावेळी जनजागृती करणाऱ्या वाहन रॅलीला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि नवनिर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.
महिला दुचाकी रॅलीत सहभागी झालेल्या महिला, मोटार ड्रायव्हींग स्कूल मालक संघटना, रस्ता सुरक्षा प्रबोधन करणाऱ्या संघटना तसेच एसटी महामंडळात विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वाहतूक सुरक्षा या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले. वाहन निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी आभार प्रदर्शन केले. पत्रकार जान्हवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.