
लांजा: लांजा तालुक्यात कासारी-मुचकुंदी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या खासगी कंपनीमार्फत या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता १ हजार ७५० मेगावॅट आहे. त्यासाठी अंदाजे ६ हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या एकाच प्रकल्पातून थेट लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थित मुंबईत नुकतेच हे सामंजस्य करार झाले. प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांची खरेदी स्थानिक स्तरावर केली जाईल. ज्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल. प्रकल्पांच्या उभारणीसाठी रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. १६०० लोकांना रोजगार मिळणार असून, स्थानिक तरुणाईसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. कासारी-मुचकुंदी हा प्रकल्प म्हणजे एका व्यापक ऊर्जानिर्मिती धोरणाचा भाग आहे. वॉटरफ्रंट कंपनी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६४५० मेगावॅट क्षमतेचे विविध जलविद्युत प्रकल्प राबवणार आहे. यासाठी एकूण ३१ हजार ९५५ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

लांजा येथील जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून एकत्रितपणे १५ हजार रोजगार संधी निर्माण होतील. यामध्ये कुशल-अकुशल मजुरांपासून ते अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि व्यवस्थापन स्तरावरील तज्ज्ञांचा समावेश असेल. जलविद्युत प्रकल्प हे पर्यावरणासाठी अनुकूल मानले जातात कारण, ते स्वच्छ ऊर्जा निर्माण करतात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करतात. वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या गुंतवणुकीमुळे रत्नागिरी जिल्हा ऊर्जा निर्मिती आणि रोजगार निर्मितीच्या नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, अशी आशा आहे.
१ लाख ११ हजार रोजगार निर्मिती
यापूर्वी १६ अभिकरणांसह ४६ प्रकल्पांसाठी करार झाले असून, आजच्या करारानंतर ५० प्रकल्पांद्वारे ६८ हजार ८१५ मेगावॅट वीजनिर्मिती, ३.७५ लाख कोटींची गुंतवणूक आणि १.११ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
