जनशक्तीचा दबाव न्यूज | बीड | फेब्रुवारी ०२, २०२३.
बीड जिल्ह्यात स्विफ्ट कार-दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून तिसऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
बीडमधील लहामेवाडी या गावातील काही मजूर तेलगाव येथे असलेल्या एका जिनिंगवर काम करतात. नेहमीसारखा जिनिंग ते गाव असा प्रवास जिनिंगमधल्या कामगारांचा असतो. मात्र, काल रात्री या भीषण अपघाताची घटना घडली. जिनिंगवरून आपल्या दुचाकीवर तीन मजूर गावी म्हणजेच लहामेवाडीकडे जात होते. परतताना रस्त्यात स्विफ्ट कारचा आणि या मजूरांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मजूर जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लक्ष्मण कापसे, नितीन हुलगे आणि अण्णा खटके असं अपघातात मृत झालेल्या तिघांचे नाव आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात कारमध्ये असलेले काहीजण किरकोळ जखमी झाले. या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने लहामेवाडी गावात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पुढील पंचनामा केला.