देशभरात फेब्रुवारी महिन्यातच कडक उष्णता जाणवायला लागली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातील तापमान पाहता पुढील महिन्यांमध्ये काय होणार याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. सलग दुसऱ्या वर्षी देशात फेब्रुवारी महिन्यात उष्णता वाढली आहे. या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात दिवसाचे तापमान वाढू लागले आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात तापमानात झपाट्याने वाढ झाल्यामुळे किमान २९ जिल्हे या फेब्रुवारीत मध्यम कोरडे पडले आहेत. तर नऊ जिल्हे अत्यंत कोरडे पडले आहेत. यातील दार्जिलिंग जिल्हा अत्यंत मोठ्या प्रमाणात कोरडा पडला आहे. खरंतर दार्जिलिंग हे ठिकाण हिरवीगार जंगले आणि टेकड्यांवरील चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. तरीदेखील हा जिल्हा कोरडा पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी या कालावधीत हिंदुस्थानात फक्त एक मध्यम कोरडा जिल्हा होता, तर कोणताही जिल्हा गंभीर किंवा अत्यंत कोरडा नव्हता.