पंतप्रधानांच्या योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वीज पुरवठा सुधारणेसाठी २५०० कोटींची कामे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती…

Spread the love

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने देशभर वीज वितरण व्यवस्था सुधारणेसाठी हाती घेण्यात आलेल्या आरडीएसएस या योजनेअंतर्गत आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात एकूण २५२० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा व्यवस्था आमूलाग्र बदलेल व त्याचा जिल्ह्यातील वाढत्या उद्योग व पर्यटन व्यवसायाला लाभ होईल, असे एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी मंगळवारी रत्नागिरी येथे सांगितले.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानिर्मितीचे संचालक अभय हरणे, महापारेषणचे संचालक संदिप कलंत्री, महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत, महानिर्मितीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, महापारेषणचे मुख्य अभियंता चिदप्पा कोळी आणि महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक एस. ए. पाटील उपस्थित होते.

मा. विश्वास पाठक म्हणाले की, मा. मोदीजींची आरडीएसएस योजना आणि उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामुळे राज्याच्या वीज क्षेत्रामध्ये परिवर्तन होणार आहे. आगामी १८ ते २४ महिन्यात याची कामे पूर्ण होणार आहेत.

मा. पंतप्रधानांच्या आरडीएसएस योजनेत जिल्ह्यात नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, नवे ट्रान्सफॉर्मर बसविणे, वीज जाळे मजबूत करणे, तारा बदलणे, स्मार्ट मीटर बसविणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील वादळाचा धोका ध्यानात घेऊन आपत्ती सौम्यीकरणासाठी सुमारे तीनशे कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने समुद्र किनाऱ्या जवळच्या भागात वीज वाहिन्या भूमीगत करण्याचे काम होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मा. पाठक यांनी सांगितले की, वीज कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीतील ही आपली राज्यातील शेवटची ३४ वी बैठक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विजेची तांत्रिक तसेच वाणिज्यिक हानी केवळ ८ टक्के आहे. इतर बाबतीतही रत्नागिरी जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. इतर जिल्ह्यांनी अनुकरण करावे अशी ही कामगिरी आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page