ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अशात आज ५ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई IMD ने जारी केलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या ५ जिल्ह्यांना आज २४ तासांचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट…
कोकणात सर्वत्र धुवांधार पाऊस सुरू असून रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अशात हवामान विभागाकडून आज रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट…
हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानुसार, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, कोल्हापूर या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अतिशय कमी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
जाहिरात