गणपतीपुळे किनार्‍यावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर,गणपतीपुळे देवस्थानकडून आठ कॅमेऱ्याची उभारणी

Spread the love

रत्नागिरी : प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थान व गणपतीपुळे किनार्‍यावर २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार, गणपतीपुळे देवस्थानकडून किनार्‍यावर पाच आणि मंदिर परिसरात तीन असे एकूण आठ कॅमेरे लावले आहेत. किनार्‍यापासून खोल समुद्रात साधारणपणे दोनशे मीटर आतील दृश्य टीपू शकतील, असे दर्जेदार कॅमेरे जोडण्यात आले आहेत.
दरवर्षी लाखो पर्यटकांचा राबता असलेले प्रसिद्ध ठिकाण म्हणून गणपतीपुळेचा समावेश आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकही येथे येतात. प्रसिद्ध श्री गणपतीचे पुरातन मंदिर, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य परिसर यामुळे गणपतीपुळेत येणार्‍या पर्यटकांचा कल वर्षभर असतो. पश्‍चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक भक्तगण अंगारकी, संकष्टी चतुर्थीला येथे येतात तर मुंबई-पुण्यासह बेळगावमधून शनिवार, रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखला जात होता. या ठिकाणी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह देवस्थानकडून केलेल्या उपाययोजनांमुळे बुडण्याच्या घटनांवर आळा घालण्यात यश आले आहे. बोटिंग सुरू झाल्यामुळे हा किनारा अधिक सुरक्षित झाला आहे. तरीही वाढती गर्दी पाहता या किनार्‍यावरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकुर्णी यांच्या सुचनेनुसार, जयगड पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या पदाधिकार्‍यांशी संर्पक साधला होता. त्यानुसार मागील आठवड्यात किनार्‍यावर पाच दर्जेदार कॅमेरे लावण्यात आले आहेत

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page