
दापोली :- तालुक्यातील सर्वात मोठे पारंपरिक बंदर असलेल्या हर्णै बंदराच्या विकासासाठीच्या २२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे. वन व मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची मासळीची उलाढाल होणारे हर्णै बंदरात बंदर जेट्टी होण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात होती; मात्र जेटी मंजूर होऊनसुद्धा प्रस्ताव धूळखात पडला होता. २२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने बंदराचा विषय मार्गी लागणार असून, लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बंदरात कॅटामरिन्स बोटींना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हर्णै बंदर नंबर दोनचे बंदर आहे. या बंदरात जेटी व्हावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे मच्छीमारांकडून केली जात होती. आता या प्रयत्नांना यश आले आहे. पारंपरिक बुरोंडी बंदरातील देखील जेटी गेली अनेक वर्ष मंजूर आहे. या जेटीचा आपण पाठपुरावा करत असून, हर्णै व बुरोंडी दोन्ही बंदरातील जेटी विषय लवकरच मार्गी लागेल, असे कदम म्हणाले.-
हर्णै बंदरातील जेटीबरोबरच पर्यटकांसाठीही सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. बंदरात सुलभ शौचालय, मासे लिलावासाठी हॉल, मासेविक्रेत्यांसाठी मच्छीमार्केट, बोटीची लावण्याची व्यवस्था विविध सुविधांचा अंतर्भाव केला जाणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.