भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतनं (Aman Sehrawat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक मिळवून दिलं आहे. भारतीय कुस्तीपटू अमननं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी कुस्तीतील कांस्यपदक सामना जिंकून इतिहास रचला आहे.
पॅरिस : भारताचा स्टार कुस्तीपटू अमन सेहरावतनं (Aman Sehrawat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी कुस्तीतील कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यासह त्यानं भारताला सहावं पदक जिंकवून दिलं आहे.
उपांत्य फेरीत झाला होता पराभूत-
उपांत्य फेरीत आव्हानात्मक सामना गमावल्यानंतर अमननं कांस्यपदकापर्यंत मजल मारली. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या रे हिगुचीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जो माजी विश्वविजेता आणि रिओ 2016 ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता आहे. तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर अमनला हिगुचीनं अमनला 10-0 नं पराभूत केलं होतं.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मिळवला विजय-
याआधी स्पर्धेत अमननं सुरुवातीचे सामने सहज जिंकून आपल्या दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात त्यानं माजी युरोपियन चॅम्पियन मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 अशा तांत्रिक श्रेष्ठतेसह पराभव केला. यानंतर अमननं उपांत्यपूर्व फेरीत अल्बानियाचा माजी विश्वविजेता आणि चौथा मानांकित झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव करून विजय मिळवला.
पॅरिस ऑलिम्पिकमधलं कुस्तीतलं पहिलं पदक : पॅरिस
ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या स्पर्धेत भाग घेणारा 21 वर्षीय अमन एकमेव कुस्तीपटू होता. देशाच्या अपेक्षांचा भार त्यानं आपल्या खांद्यावर घेतला. त्यानं टोकियो 2020 चा रौप्यपदक विजेता रवी दहिया याला भारतीय कुस्ती चाचण्यांमध्ये पराभूत करुन ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान मिळवलं होतं. यानंतर आता त्यानं कांस्यपदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये महिला आणि पुरुष कुस्तीपटूंना अद्याप एकही पदक जिंकता आलेलं नव्हतं. मात्र अमननं ही कसर भरुन काढली. 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये भारत कुस्तीत एक तरी पदक जिंकत. याहीवर्षी ही परंपरा अमननं कायम ठेवली.