३० सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करता येणार
नवीदिल्ली- दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. रिझर्व्ह बँक आता ३० सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा परत घेणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून ३० सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिली आहे.
दोन हजारांच्या नोटा बंद होणार नसल्या तरी त्यांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. दोन हाजारांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येणार आहे, असं आरबीआयने जाहीर केलं आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करुन बदलण्याची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चार महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचं RBI ने स्पष्ट केलं. फक्त एकावेळी २० हजार रुपये बदलता येणार आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वात मोठी असलेली एक हजाराची नोट बंद करुन दोन हजाराची नोट चलनात आणली होती. आता ही सर्वात मोठी असलेली दोन हाजारांची नोट हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा बाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषित केली होती. त्यानंतर दोन हजाराची नोट चलनात आली होती. मात्र, काही दिवसांपासून ही नोट गायब झाल्यामुळे सदरील नोटा गेल्या तरी कुठे? असे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. सुरूवातीच्या काळात दोन हजारांच्या नोटांची चलती होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी,” असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयने सांगितले की, २३ मे पासून एकावेळी केवळ २० हजार रूपयांच्याच २ हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी १९ शाखा उघडणार आहे.