मुंबई – अंमलबजावणी संचालनालय(ED) नं मुंबई महानगरपालिकेच्या कोविड सेंटर घोटाळ्याबाबत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी असलेले सूरज चव्हाण यांच्या घरीही १७ तास ईडीने चौकशी केली. या तपासात मुंबई महापालिकेत कोविड काळात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तपासात २ हजार रुपयांचे बॉडीबॅग ६८०० रुपयांना खरेदी करण्यात आली. हे कंत्राट महापालिकेचे तत्कालीन महापौर यांच्या आदेशावर देण्यात आले होते असा खुलासा झाला आहे
ED च्या तपासात बीएमसीकडून कोविड काळात जी औषधे खरेदी ती बाजारात २५-३० टक्के स्वस्त मिळत असल्याचे समोर आले. याचा अर्थ जास्त दर देऊन महापालिकेने औषधांची खरेदी केली. विशेष म्हणजे याबाबत नोटीस जारी होऊनही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला. सूत्रांनुसार, लाईफलाईन जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची संख्या BMC च्या बिलात दाखवलेल्या संख्येपेक्षा ६०-६५ टक्के कमी होती. बिलिंगसाठी कंपनीने ज्या डॉक्टरांची नावे दिली जे त्या संबंधित केंद्रात चुकीच्या पद्धतीने काम करत होते किंवा करतच नव्हते असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे.
एका अधिकाऱ्याने म्हटलं की, ईडीने महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत झालेल्या अनियमिततेचा तपासाचा भाग म्हणून महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाची पडताळणी केली. ईडीची टीम CPD विभागात दाखल झाली. त्यावेळी सुजित पाटकर यांच्यासह अन्य ३ भागीदारांशी संबंधित कंपनीला दिलेला टेंडर आणि कामाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले. बुधवारी कोविड घोटाळ्याबाबत जी छापेमारी केली त्यात मोठी रोकड जमा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १५० कोटींचे ५० हून अधिक स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, १५ कोटींचे दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉपसारखे अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दस्तावेजासह २.४६ कोटी जप्त केले. ईडीने बुधवारी सुजित पाटकर यांच्या घरासह १५ ठिकाणी धाड टाकली. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. ज्याठिकाणी छापेमारी केली त्यात IAS अधिकारी संजीव जयस्वाल, शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्या ठिकाणाचाही समावेश आहे.