
जम्मू-काश्मिर- जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा दलांच्या शोध मोहिमेदरम्यान अचानक आयईडी स्फोट झाला. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत, तर चार जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी वेळोवेळी शोध मोहीम राबवत आहेत. अशीच एक शोध मोहीम राजौरी येथे सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला येथे २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. या चकमकीदरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांतील ही तिसरी चकमक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक राजौरीतील कंडी भागात सुरु असून, त्यात दोन-तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ जवान शहीद झाले आहेत, तर ४ जखमी झाले आहेत. जखमींना हेलिकॉप्टरने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. यादरम्यान २ दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. राजौरीमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफने माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दल दहशतवाद्यांजवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली.