ठाणे- समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे आज मंगळवारी पहाटे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशिन आणि क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तीन ते चारजण गंभीर जखमी आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून गर्डरखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. सध्या डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाऱ्याखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे
समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शहापूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात १५ मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. १५ मृतदेह हे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन ते चार जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गर्डर आणि क्रेनच्याखाली नेमके कितीजण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येत नाही. विकासाचा मार्ग म्हणून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र, पहिल्या दिवसापासूनच या मार्गावर आपघातांची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट यात २५ प्रवासी जळून ठार झाले होते.
ही घटना ताजी असतांना समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्याचे काम सुरू असतांना ठाण्यातील शहापूर येथील सरलांबे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू असून हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण कारायचे आहे. तब्बल शंभर किलोमीटरचा हा तिसरा टप्पा आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले .