सोमेश्वर येथे विश्व मंगल गोशाळा सुरू करण्यात आली आहे. सदर गोशाळेमध्ये रत्नागिरी शहर परिसरातील जी उनाड व भटकी गाई गुरे आहेत त्याचे संगोपन सुरू आहे. श्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणी केली होती. कार्यकर्त्यांना गोशाळेच्या बांधकामासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते.गाईच्या संगोपनासाठी शेडची गरज आहे हे महत्त्वाचे काम त्यांच्या लक्षात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 20 सप्टेंबर ला महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या असणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौ .सुवासी रवींद्र चव्हाण यांनी गोशाळेच्या शेड साठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सा. बा. मंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक श्री. अनिकेत पटवर्धन यांनी सातत्याने केलेले सहकार्य व स्मरण या कामी महत्त्वाचे ठरले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता भाजप कार्यालयामध्ये दक्षिण रत्नागिरीचे भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री राजेश सावंत यांच्या उपस्थितीत गोशाळेच्या शेडसाठी चा निधी विश्व मंगल गोशाळा कार्यकर्त्यांना देण्यात आला.
याप्रसंगी श्री निलेश आखाडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीताने श्री.राजेश आयरे यांनी केली.
याप्रसंगी राजन फाळके भाजपा शहराध्यक्ष, प्रशांत डिंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर , शिल्पा मराठे महिला मोर्चा प्रदेश सचिव त्याचप्रमाणे श्री .विक्रम जैन ,डॉक्टर केळकर आणि बहुसंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सोमेश्वर शांतीपिठाचे श्री रविंद्र इनामदार , श्री राजेश आयरे श्री पाटील, सौ.अनुजा पेठकर, श्री ओंकार गर्दे, श्री राकेश वाघ, श्री. देवेंद्र झापडेकर, श्री भुरणे, छाया अनावकर, श्री विलास सावंत, श्री विनायक हाथकमकर हे उपस्थित होते.
यावेळी श्री राजेश आयरे यांनी सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळा या माध्यमातून रत्नागिरी शहरातील 50 गाईंचे सद्यस्थितीत संगोपन सुरू असून भविष्यामध्ये 200 ते 250 गाईपर्यंत ही संख्या वाढणार आहे असे सांगितले .सर्वांनी गोपालन संगोपनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. श्री इनामदार यांनीही सोमेश्वर शांतीपिठाची माहिती व सर्वांनी विश्व मंगल गोशाळेला भेट देण्याची विनंती केली.
याप्रसंगी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत म्हणाले की रत्नागिरी वासीय आणि हिंदु धर्मीय म्हणून सर्वांनी ठरवले तर रत्नागिरीतील सर्वच्या सर्व गाईंचे संगोपन सोमेश्वर शांतीपिठाच्या वतीने करण्यात येईल. मात्र आपण गाईला देवता मानतो आणि सोयीस्करपणे तिच्याकडे दुर्लक्ष करतो हे हिंदू म्हणून वागणे कितपत योग्य आहे? याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने या कामात खारीचा वाटा उचलला तरी हे काम प्रगतीपथावर जाईल आणि रत्नागिरी मधील गाईंची होणारी हेळसांड थांबेल. सर्वांना त्यांनी सहकार्याचे आवाहन केले. स्वतः त्यांनी 100 गोप्रेमींना या प्रकल्पाशी जोडण्याचा संकल्पही या निमित्ताने केला. उपस्थित सर्व भाजप कार्यकर्ते व हिंदू धर्मावर प्रेम करणारे नागरिकही याप्रसंगी उपस्थित होते.यां सर्वांनी या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे निश्चित केले. श्री आखाडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.