सोलापूर l 06 जुलै- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात सजावटीचे काम सुरू आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असतानाच हे काम मंदिर समितीकडून सुरू आहे. याचा भाग म्हणून विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात १३० किलो वजनाची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मंदिराला पूर्वीचे रूप देण्याचे काम पूर्ण झाल्याने पंढरीत येणारे वारकरी व भाविकांना मंदिराचे नवे रूप पाहण्यास मिळत आहे. दरम्यान विठुरायाच्या गाभाऱ्यातील पूर्वीची जीर्ण झालेली मेघडंबरी काढून त्या ठिकाणी नवीन सागवानी मेघडंबरी बसविण्यात आली आहे.
लातूर येथील सुमीत मोर्गे या विठ्ठल भक्ताने मेघडंबरीसाठी सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांची चांदी दिली आहे. यातून विठ्ठलाच्या मेघडंबरीसाठी १३० किलो व रुक्मिणीच्या मेघडंबरीसाठी ९० किलो चांदी वापरण्यात आली आहे. यामुळे विठुरायाचे रूप अधिकच खुलले आहे.