29 ऑक्टोबर/रत्नागिरी: खेड, दापोली व मंडणगड पोलीस ठाणे आणि वसाहतींना निधी दिला जाईल. जिल्ह्यातील सर्वच पोलीस वसाहती अत्यंत चांगल्या पद्धतीची असावीत, याच भावनेतून रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी १२९ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे हे सद्भावनेचे केंद्र ठरले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
दापोली पोलीस ठाण्याच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाला. यावेळी आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पद्मश्री दादासाहेब इदाते, माजी ॲडमीरल विष्णू भागवत उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, दापोली शहराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सीसीटीव्ही च्या मागणीला आजच मंजुरी देतो. पोलिसांची आदरयुक्त भीती असेल, तर गुन्हे कोठेही घडणार नाहीत. पोलिसांनी समन्वयातून मार्ग काढावा. समन्वय केंद्र म्हणून पोलीस ठाणी ठरली पाहिजेत. तक्रार आल्यास तिच्याकडे कुटुंबातील तक्रार म्हणून पोलिसांनी पहावे. पोलिसांनी पारदर्शक असलेच पाहिजे. जिल्ह्याला मोठे करण्यासाठी वर्दीचा उपयोग करावा, असेही ते म्हणाले.
आमदार योगेश कदम म्हणाले, खेड, दापोली आणि मंडणगड पोलीस वसाहती प्राधान्याने शासनाने घेतल्या आहेत. त्याला मंजुरी मिळावी. सागरी सुरक्षिततेसाठी जिल्हा नियोजनमधून कमीत कमी दोन बोटी कर्मचाऱ्यांसह उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पवार म्हणाले, सागरी सुरक्षेसाठी २५ बोटी असून, त्यातील काही बोटी बंद आहेत. जिल्हा नियोजनमधून यासाठी सुविधा करता आली, तर त्याचा सागरी सुरक्षेसाठी फायदा होईल. पर्यटकांकरिता वेगवेगळ्या सुविधा देवू शकलो, तर पर्टक पोलिसिंगचा वेगळा ठसा राज्यात उमटवता येईल.
प्रास्ताविकेत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, स्मार्ट शहर दापोली विकसित करण्यासाठी ते सीसीटीव्ही खाली आणावे लागेल. शिवाय वाहतूक नियंत्रणासाठीही सिग्नल यंत्रणा बसवावी लागेल.
अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले. पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत धून वाजवून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.