लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव येत्या शुक्रवारपासून (दि. ३१ मार्च) सुरू होत आहे. यावर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मिरज येथील ड़ॉ. भास्कर प्राणी आणि कुटुंबीय करणार आहेत.
चैत्र शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच ६ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. पहिल्या दिवशी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. त्यानिमित्ताने रात्री १० वाजता अभिषेक काळे गीतरामायण सादर करतील.
शनिवार, १ एप्रिल ते गुरुवार, ६ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत रविवारी (दि. २ एप्रिल) शशिकांत गुण्ये यांच्या यजमानपदाखाली सौरयाग, तर अखेरच्या दिवशी डॉ. भास्कर प्राणी यांच्या यजमानपदाखाली दत्त याग होईल. शनिवार ते बुधवारपर्यंत दररोज रात्री ९ वाजल्यानंतर हभप मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची कीर्तने होणार असून शुक्रवारी पहाटे ४ वाजता हभप महेशबुवा सरदेसाई यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. याच काळात रविवार ते मंगळवारपर्यंत दररोज रात्री अनुक्रमे सौ. शिल्पा आठल्ये यांचा स्वरशिल्प हा कार्यक्रम, श्रीकांत सावंत यांचा स्वरश्रुती हा कार्यक्रम आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे निवेदन असलेला धनश्री आपटे यांचा संकीर्तनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी कुंकमार्चन आण हळदीकुंकवाचा कार्यक्रम, तर गुरुवारी, ६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
मंदिराजवळच भक्त निवास उभारणे प्रस्तावित असून इमारत बांधकामाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. त्याकरिता भरीव निधीची आवश्यकता असून त्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करावी. तसेच वार्षिक चैत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये, चिटणीस श्रीनिवास गुण्ये आणि खजिनदार सतीश चांदोरकर यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६