सातारा,कोरेगांव- ऋषिकेश हा बी.ई.मेकॅनिकल, (डॉ. डि. वाय.पाटील कॉलेज पुणे) येथील पदवीधर असूनही तो जळगांव ता. कोरेगांव येथे सुप्रभा सुपरपॉवर लाॅन्ड्री या नावाने लॉन्ड्री व्यवसाय करत आहे. जंबो मशिनच्या सहाय्याने गोधडी (वाकळ) ,ब्लॅंकेट,रजई,सतरंजी, चादर,बेडशीट तसेच मंडपाचे पडदे धुवून व वाळवून दिले जातात. आजूबाजूच्या अनेक गावातून तसेच कोरेगांव, खटाव,वाई तालुक्यातूनहि लोक अंथरूण-पांघरूनाचे साहित्य धुण्यासाठी देत असतात.
गुरुवार दि. 27 एप्रिल रोजी गावातीलच श्री दत्तात्रय हणमंत जाधव (भोसले) यांनीही घरातील वाकळा धुण्यासाठी दिल्या होत्या.भोसले यांची रानात वस्ती आहे. त्यांचे वडील वयस्कर असल्याने वडिलांची झोपण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. वडील वृध्द असले तरी ते परावलंबी नाहीत कारण ते माजी सैनिक असल्याने पेन्शनर आहेत. त्यामुळे साहजिकच हाताशी चार पैसे खेळते असतात.
गुरुवारी दत्तात्रय भोसले यांच्या पत्नीने घरातील सर्व वाकळा धुण्यासाठी काढल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या वृध्द सास-यांच्याहि वाकळा बाजूला काढल्या होत्या. काही दिवसांपूर्वी वडिलांनी 10000/-₹ वाकळांच्या घडित ठेवले होते त्याबद्दल त्यांनी कुणाला सांगितले नव्हते. भोसले हे सर्व साहित्य मोटरसायकल वरुन लॉन्ड्रीत पोहोच करुन आले. आणि शुक्रवारी सकाळी वडिलांना वाकळेतिल पैशाचे स्मरण झाले. तेव्हा त्यांच्या सूनेने वाकळा झटकूनच गाडीवर टाकल्याचे सांगितले. पण तेव्हा पैसे नव्हते, असते तर खाली पडले असते ….मग पैसे गेले कुठे?… सासरा आणि सूनेची शोधाशोध सुरु झाली. अर्थातच सास-याचा दंगा सुरु झाला तो काही थांबेना. त्यांना शांत करण्यासाठी दत्तात्रय यांनी किती पैसे होते? मि देतो, पण शांत बसा! असा सल्ला दिला खरा, पण रक्कम ऐकून तेही स्तब्ध झाले.
मग तिघेही सर्व घरभर शोध घेऊ लागले. तिघेही सकाळच्या नाष्ट्यापासून वंचित होते. शेवटी निराश होऊन एक शेवटचा उपाय म्हणून ऋषिकेश ला फोन केला. फोनवर संपर्क करेपर्यंत त्यांचे हेच म्हणणे होते कि वाकळा झाडून दिल्यात त्यामुळे पैसे लॉन्ड्रीत जाण्याची शक्यता नाही. आणि जरी पैसे वाकळंत राहिले असते तरी रस्त्याने जाताना पडण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा नकारात्मक विचारातच त्यांनी फोन केला परंतु ऋषिकेश ने त्यांना जणू एक सुखद धक्काच दिला. व्यवस्थित खात्री करूनच ऋषी ने सर्व रक्कम आजोबांच्या हस्ते श्री दत्तात्रय भोसले यांचेकडे सुपुर्द केली.
हि बातमी कळताच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी व मित्रमंडळींनी फोनवरून ऋषी चे अभिनंदन आणि कौतुक केले असले तरी एक वडील म्हणून मला खूपच अभिमान वाटतोय.गावातील ज्येष्ठ महिला यानिमित्ताने ऋषिकेशने दिवंगत आजीच्या (कै.सुभद्राकाकींच्या) संस्काराचे नातवाने चिज केल्याचे बोलून गेल्या.