
पुणे: मावळ परिसरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली आहे. गुरुवारी (२७ जुलै) रात्री ८.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कामशेतचा मोठा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही दरड आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर आज दुपारी अडीच नंतर एक्सप्रेस वेची मुंबई मार्गिका सुरु करण्यात आली होती.
आता या घटनेमुळे मुंबई मार्गिका पुन्हा विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती समजताच एक्स्प्रेस वेवरील देवदूत यंत्रणा आणि आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मार्गावर आलेले दगड आणि माती बाजुला काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
बोरघाट येथे आज दरड काढण्यासाठी नुकताच १२ ते २ ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. ड्रिल मारून या दरडी आज पाडण्यात आल्या. नागरिकांना याचा कोणातही त्रास होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहेत. मात्र, आज संध्याकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.