मुंबई – गोवा महामार्गावर बसला ट्रेलरची धडक ; १ ठार ११ जखमी…

Spread the love

पोलादपूर- मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर ग्रामीण रुग्णालय नजीक उभ्या लक्झरी बसवर भरधाव ट्रेलरची धडक बसून झालेल्या अपघातात एक खाली उतरलेला प्रवासी जागीच ठार झाला, तर अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी एका स्कुटरलाही धडक बसल्याने हा तिहेरी अपघात ठरला आहे. याच ठिकाणी गेल्या महिन्यात उभ्या कंटेनरला भरधाव कारने धडक दिल्याने दोन जण ठार झाले होते.

बुधवारी सकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घाटकोपर ते कामथे जाणारी कदम ट्रॅव्हल्स लक्झरी बस ही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर आली असता प्रवासी उतरण्यासाठी महामार्गावर साईडवर बस उभी करण्यात आली होती. यावेळी महाड दिशेकडून पाठीमागून भरधाव येणारा ट्रेलरने (क्र. आर जे 09 जी डी 4576) लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात एक जण ठार, तर 11 जण जखमी झाले आहेत. ही धडक एवढी जोरदार होती की, लक्झरी बसचालकाच्या डोक्याला मार लागून तो जागीच बेशुद्ध झाल्याने बस सुमारे 200 ते 250 फूट महामार्गावर पुढे गेली. मात्र, प्रसंगावधान राखून सोबतच्या दुसर्‍या चालकाने हॅन्ड ब्रेक ओढून बस थांबविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला असल्याचे प्रवाशांनी सांगितले. या बस मधून 30 प्रवासी चालक, सहचालक व क्लीनर असे एकूण 33 जण प्रवास करीत होते.

दरम्यान, लक्झरी बससमोर उभी असलेल्या अ‍ॅक्टिवा स्कुटरवरील (एम एच 02 जी सी 2415) चालक लघुशंकेसाठी थांबला असताना त्यालाही ठोकर लागून जखमी झाला असल्याने हा तिहेरी अपघात झाला आहे.

या अपघातात बसमधून खाली उतरलेले प्रवासी रवींद्र यशवंत सकपाळ हे लक्झरी बसच्या डिकीमधून सामान उतरवित असताना भरधाव ट्रेलर बसवर आढळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शुभम दीपक दरेकर (26), चालक विश्‍वनाथ विठ्ठल उतेकर (32), संतोष गेनू केसरकर (48), महादेव सखाराम गोगावले (55), ओंकार चंद्रकांत सकपाळ (24), नारायण श्रीपत सणस (72), सूरज सखाराम जाभडे (30), निखिल रवींद्र सकपाळ (30), विष्णू तुकाराम सणस (60), जनाबाई सुरेश सलिमकर (43), चंद्रकांत तुकाराम गोगावले (59) यांना डोक्याला, हाताला तसेच पायाला मार लागून जखमी झाले आहेत.

यापैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी महाड येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळताच एएसआय भाऊराव शिंगणकर, हवालदार रवींद्र सरनेकर, संग्राम बामणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले तर 108 रुग्णवाहिका चालक संदेश राणे व डॉ. नागरे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातावेळी तालुकाप्रमुख निलेश अहिरे, वामन उतेकर, शिवाजी उतेकर, मारुती जाधव, सुरेश सुतार यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page