गतवर्षी २,१५८ वाहन चालकांनी घेतले पसंती क्रमांक; पसंती नंबरसाठी रिक्षाचालकाने मोजले तीन लाख
रत्नागिरी (प्रतिनिधी) : गाडीसाठी आकर्षक नंबर असावा अशा अपेक्षेने अनेक वाहनचालक पावले उचलतात. यातून आरटीओ कार्यालयाला महसूल मिळतो. गेल्या वर्षभर येथील आरटीओ कार्यालयाने अशा ‘चॉइस नंबरमधून १ कोटी ७७ लाख ३४ हजार एवढा महसूल मिळाला. वर्षभरात २,१५८ वाहनचालकांनी ‘चॉइस नंबर घेतले.
वाहनासाठी विशेष प्रकारचा नंबर अनेकांना हवा असतो. काहींना विशेष नंबरची बेरीज असलेला नंबर तर काहींना शेवटी सम किंवा विषम नंबर येणारा नंबर हवा असतो. काहींना एकच नंबरची पुनरावृत्ती असलेला नंबर लागतो. चॉइस नंबरमधून आरटीओ कार्यालयाला महसूल मिळतो. अगदी ३००० रुपयांपासून ३ लाखांपर्यंत असणारे नंबर घेणारेही काही वाहनचालक आहेत. गेल्या वर्षभरात येथील आरटीओ कार्यालयाने अशा चॉइस नंबरमधून १ कोटी ७७ लाख ३४ हजार रुपयांची कमाई केली.
या वर्षभरात ५००० रुपये भरणारे सर्वाधिक ४७० वाहनचालक असून चॉइस नंबरसाठी ३ लाख मोजणारा एक वाहनचालक आहे. दीड लाख देणारे ७, तर ७० हजार देणारे ५ वाहनचालक आहेत. गेल्या २०२२ – २३ या आर्थिक वर्षात येथील आरटीओ कार्यालयाने आकर्षक नंबरच्या विक्रीतून १ कोटी ७७ लाख ३४ हजार एवढे उत्पन्न मिळविले. मार्च २०२३ या एकाच महिन्यात ३१७ वाहनचालकांकडून चॉइस नंबरच्या विक्रीतून २७ लाख ७ हजार ५०० रुपये एवढे उत्पन्न मिळविले.
यामध्ये एप्रिल महिन्यात १६ लाखांची कमाई झाली. नव्या आर्थिक वर्षात आरटीओने आकर्षक नंबरच्या विक्रीतून १६ लाख ४० हजार रुपयांची कमाई केली आहे, तर मार्च महिन्यातही सुमारे २७ लाखांचा महसूल मिळाला. एकाच चॉइस नंबरसाठी अधिक अर्ज आल्यास त्या नंबरसाठी लिलाव होतो. त्यातून जी सर्वाधिक बोली होईल, त्याला तो आकर्षक नंबर दिला जातो. गेल्या वर्षभरात चॉइस नंबरसाठी ५००० हजार मोजणारे सर्वाधिक ४७० वाहनचालक असून यातून आरटीओ कार्यालयाला २ लाखांचा महसूल मिळाला.