
⏩आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे. साधारणतः पचनसंस्थेत आम्लाची, अल्कलीची निर्मिती होत असते. आम्लाची निर्मिती झाल्यावर त्याच्या उदासिनीकरणासाठी त्याविरुद्ध अल्कलीचे प्रमाण वाढते.
⏩अल्कली निर्माण होण्यास गॅस्ट्रीन हे संप्रेरक कारणीभूत असते. अल्कलीचे प्रमाण वाढले की, व्हॅगस नावाच्या चेतातंतूद्वारे उद्दीपन होऊन आम्लाची निर्मिती होते व अल्कली उदासीन होतात. परंतु बऱ्याचवेळा उदासिनीकरणानंतरही आम्लाची निर्मिती होत राहते व जादा आम्ल तयार होण्याने तक्रारी सुरू होतात. यालाच आम्लपित्त होणे असे म्हणतात.
या जास्तीच्या आम्लामुळे पोटात छातीत जळजळ, तोंडाला आंबट पाणी येणे व कधी कधी उलटी होणे, अशा तक्रारी सुरू होतात.
⏩आम्लपित्ताच्या तक्रारी पुढे अन्नमार्गात होणाऱ्या अल्सर मध्ये म्हणजे व्रणात रूपांतर होऊ शकते.
आम्लपित्त या आजाराचे प्रमाण खेडय़ांपेक्षा शहरी लोकांत जास्त आहे. कारण Hurry-Worry-Curry या गोष्टी शहरात राहणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिनीचा एक भाग झालेला असतो.
⏩Hurry म्हणजे घाई, धावपळ. बस, लोकलच्या वेळा सांभाळणे, त्यासाठी घाईघाईने जेवणे, सर्व गोष्टी वेळांमध्ये बसवण्याची कसरत करत राहणे, जेवणाच्या वेळातील अनियमितता.
Worry म्हणजे व्यवसायानुरूप येणाऱ्या, सामाजिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या चिंता; तसेच
Curry म्हणजे मसालेदार पदार्थ.
⏩खूप तिखट, तेलकट, आंबट पदार्थ वारंवार खाण्यामुळे; तसेच दारू, सिगारेट यांचे अतिसेवन यांमुळे जठरातील आम्लनिर्मिती प्रमाणापेक्षा अधिक होऊन आम्लपित्ताच्या तक्रारी सुरू होतात.
⏩आम्लपित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर वरील सर्व गोष्टी टाळणे; दिनचर्या नियमित करणे; अनाठायी चिंता, बिडी, सिगारेट, दारू, तंबाखू यांचा अतिरेक न करणे; तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ कमी खाणे हे उपाय करायला हवेत.
⏩आम्लपित्तावर अँटासिडच्या गोळ्या वापरतात. घरगुती उपायांमध्ये सोडा, लिंबू घेऊन हा त्रास कमी करता येतो. जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे, जागरण टाळणे; आहारात ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, हिरव्या पालेभाज्या, ताक यांचा समावेश करणे; व्यसने टाळणे या उपायांनी आम्लपित्तावर नक्कीच मात करता येईल.
⏩आयुर्वेदात यासाठी खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. अर्थात औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे विसरता कामा नये. आम्लपित्ताला व त्यामुळे होणाऱ्या व्रणांना हेलिकोबॅक्टर पायलोरी हे जीवाणू जबाबदार असतात, असे संशोधन करणाऱ्या डाॅ. मार्शल व डाॅ. वॉरेन या ऑस्ट्रेलियन संशोधकांना २००५ च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता या आजाराच्या उपचारात पुष्कळ बदल होणार आहेत.