
⏩चिपळूण- कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा मंदिरामध्ये नारळ वाढवल्याशिवाय कार्याची सुरूवात होत नाही. मंदिरामध्ये दिवसाला शेकडो नारळ भाविकांकडून फोडले जातात. परंतु या नारळातील लाखो लिटर नारळपाणी वाया जाते. शिवाय मंदिरामध्ये याचा निचरा न झाल्यास कुजल्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. ही बाब लक्षात घेवून सावर्डेच्या सह्याद्री पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी नारळ पाणी संकलन उपकरण बनवले आहे.
⏩नारळ फोडल्यानंतर त्यातील पाणी वाया घालविले जाते. वास्तविक नारळातील पाणी हे खूप आरोग्यदायी असते. यामुळे आमदार शेखर निकम यांनी सावर्डे सह्याद्री पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना यावर उपाययोजना करण्याविषयी सुचविले. यातून प्राचार्य मंगेश भोसले आणि प्रा. देवरूखकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑटोमोबाईल शाखेमध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नारळ पाणी संकलन उपकरण बनविले आहे.
⏩यामध्ये नारळ सहजपणे फोडण्यासाठी धातूच्या प्लेटसचा उपयोग कसा केला जातो, त्यातून बाहेर पडणारे पाणी फिल्टर करून खाली घेतले जाते आणि नळाद्वारे ते बाहेर भांड्यामध्ये गोळा केले जाते. फिल्टरमध्ये जमा झालेला कचरा ठराविक काळामध्ये स्वच्छ करता येतो. नारळ जर नासका निघाला तर ते अशुद्ध पाणी वेगळ्या नळीद्वारे बाजूला केले जाते. एकावेळी अनेक नारळ सलग फोडले तरी ते सर्व नारळपाणी छोट्या टँकमध्ये साठवून ठेवता येते आणि हवे तेव्हा एकत्रितपणे बाहेर काढून ते तीर्थ म्हणून पिण्यास वापरता येते. हे उपकरण मंदिरामध्ये ठेवले तर त्याचा उपयोग भाविकांबरोबरच मंदिर व्यवस्थापकांनाही होईल हेच नारळ पाणी त्यांना तीर्थ म्हणून भाविकांना देता येईल.