➡️मुंबई l 04 एप्रिल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. आपली अटक बेकायदा असल्याचा दावा जयसिंघानीने याचिकेत केला होता, मात्र या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
➡️न्यायमूर्ती अजय गडकरी आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली होती. जयसिंघानीकडून वरिष्ठ वकील मिजेंद्र सिंग यांनी युक्तिवाद केला. अनिल जयसिंघानीला १९ मार्चला मुंबई पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. त्याला गुजरात येथून थेट मुंबईला आणण्यात आले. या प्रवासात जयसिंघानीला स्थानिक न्यायालयात हजर करणे बंधनकारक होते, मात्र पोलिसांनी थेट मुंबई सत्र न्यायालयात हजर केले. अटकेनंतर ३६ तासांनी जयसिंघानीला न्यायालयात हजर करण्यात आले. मुळात जयसिंघानी गेली २ वर्षे गुजरात येथे होता. तेव्हा तेथे अटक का केली नाही ? जयसिंघानीच्या अटकेच्या प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष देखरेख होती.