⏩सातारा- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी सातारा येथे झालेल्या एका भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अपघातग्रस्त ट्रक हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाला हाेता. या ट्रकमध्ये नारळाची पाेती हाेती. दरम्यान ट्रकवरील चालकाचा चालू ट्रकमध्ये डोळा लागल्याने वाढे फाटा जवळ असणाऱ्या वेण्णा नदीवरील पुलाच्या कठड्याला ट्रक धडकला. यामध्ये ट्रकच्या पुढील बाजूचा भाग चालकासह नदीत कोसळला.
यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची नारळाची पोती हाेती. ही पोती पुलावरून खाली विखुरली गेली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमधील चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.