राजापूर: कोकण सांस्कृतिक कलामहोत्सव कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांतुन आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडते. या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातुन आजच्या भावी पिढीला आपल्या या परंपरा आणि संस्कृतीची महती सांगून माहिती व जाणीव करून देण्याची आणि त्या जोपासण्याचे संस्कार घडविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केले.
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, तर कोकण ही देवभूमी आहे, त्यामुळे आपल्या परंपरांचा आणि संताच्या शिकवणीचा वारसा जपण्यासाठी असे कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतात असेही राणे यांनी नमुद केले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस कोकण सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजापूर हायस्कुल पटांगणावर रंगलेल्या काय महोत्सवाला बुधवारी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थिती लावली.
याप्रसंगी आयोजकांच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तर या कोकण कलामहोत्सवात सहभाग घेतलेल्या विविध कलापथकांच्या प्रमुखांचा निलेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रंसंगी बोलताना निलेश राणे यांनी अशा प्रकारे कोकणातील विविध कलांचे दर्शन घडवीणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजत केल्याबद्दल राजापूर तालुका भाजपा व भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांचे विशेष कौतुक केले. आज् खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांची आवश्यकता असून भावी पिढीला अशा कार्यक्रमांतुन आपली संस्कृती कळली पाहिजे व त्यांनी यातुन शिकवण घेत ती जोपासली पाहिजे असे राणे म्हणाले. या कलामहोत्सवात सादर झालेले विविध कला प्रकार हेच कोकणच्या संस्कृतीचे दर्शन असल्याचे नमुद करताना वारकरी सांप्रदायाचे काम आणि कार्य मोठे असून त्यामुळेच आज समाज आणि संस्कृती टीकून असल्याचे राणे यांनी सांगितले. आपण कोण आहोत, आपले पुर्वज कोण, आपली संस्कृती काय हे आजच्या तरूण पिढीला अशा कार्यक्रमातुन कळते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजनाचे राणे यांनी कौतुक केले. रवींद्र नागरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राणे यांनी विशेष कौतुक केले. तर ना. राणे यांच्या वाढदिवसा निमत्त असे कार्यक्रम आयोजित करून आपण दिलेल्या शुभेच्छा प्रेरणादायी अशा असून यापुढेही आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्यावर कायम राहोत असे सांगितले.
बुधवारी दुसऱ्या दिवशीच्या महोत्सवात रामेश्वर रवळनाथ ढोलपथक तळगांव यांचे ढोल वादन, कुर्णेकर महाराज पायी दिंडी भांबेड यांचे किर्तन, वडचाई मित्र मंडळ रायपाटण यांचे पालखी नृत्य, तसेच मोंडेवाडी महिला मंडळ उन्हाळे हे पारंपारिक महिलांची फुगडी सादर करण्यात आली. तर भुते परिवार पेंडखळे यांचा पारंपारिक गोंधळ, पवार मंडळ दिवटेवाडी राजापूर यांचा पारंपारिक गोमुचा नाच तर हनुमान मित्र मंडळ बुवा भाऊ नारकर यांनी संगीत भजन सादर केले.
आपल्या प्रास्ताविकात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी या कार्यक्रमाबाबत माहीती देताना कोकणच्या विकासाबरोबरच कोकणच्या कला, संस्कृती आणि परंपरा जोपसण्यासाठी राणे परिवाराने कायमच योगदान दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपाच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. श्रृती ताम्हनकर, जिल्हा सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, सौ. शीतल पटेल, रमेश गुणे, मारूती कांबळे, वसंत पाटील, पिंट,या निवळकर, दीपक बेंद्रे, आदी उपस्थित होते.
प्रांरभी निलेश राणे यांचा रमेश गुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत लिंगायत यांनी केले. याप्रसंगी राजा काजवे, समीर शिंदे, संदेश आंबेकर, अमर वारीशे, आशिष मालवणकर, विजय कुबडे, माजी नगरसेवक नागेश शेटये, फेयाज नळेकर, पांगरे सरपंच वैष्णवी कुळये, शीतल रहाटे, सोनम केळकर आदींसह या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कला रसीक मोठया संख्येने उपस्थित होते.