
⏩️नवी दिल्ली अॅपल कंपनीचे आयफोन बनविणाऱ्या ‘विस्ट्रॉन’चा बंगळुरू येथील कारखाना टाटा उद्योगसमुहाच्या ताब्यात लवकरच येणार आहे. ‘अॅपल’ची उत्पादने भारतीय कंपनीद्वारे बनविण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
‘विस्ट्रॉन’चा कारखाना टेकओव्हर केल्यानंतर, टाटा समूह ‘आयफोन-१५’ बनवण्यास सुरुवात करेल. सध्या, ‘विस्ट्रॉन’च्या या भारतीय कारखान्यात आठ उत्पादन लाइन्स असून तेथे ‘आयफोन-१२’ व ‘आयफोन-१४’ हे फोन बनविण्यात येत आहेेत. टाटांनी बंगळुरूचा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून पूर्णपणे बाहेर पडेल, कारण भारतात अॅपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा तिचा एकमेव कारखाना होता.
अॅपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे ६०० दशलक्ष डॉलर इतकी आहे. अॅपल चीनमधून बाहेर पडण्याची योजना आखत असताना उत्पादनासाठी भारताकडे लक्ष देत आहे. गेल्या वर्षी, कॅलिफोर्नियातील क्युरटिनो या कंपनीने चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षांमुळे जगभरातील सुमारे २५ टक्के उत्पादन भारतात हलवण्याची आपली योजना जाहीर केली होती.